अहमदनगर-दुध दर प्रश्नी राज्यभर संघर्ष समितीच्या वतीने शासन आदेशाची होळी..

राज्यात दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाच्या चढ उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खाजगी व सहकारी दुध संघांचे व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच  सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत व दुध संघांनी आणि  कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी जाहीर केले होते. यानुसार दुधाला ३४/-  रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच  धाब्यावर बसविण्यात आला आहे. ३४/- रुपयाऐवजी बेस रेट २७/- रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा व रयत क्रांती संघटनेने याबाबत राज्यभर आंदोलने केल्याच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीतही दुध संघ व कंपन्यांनी दुध परिपत्रकाप्रमाणे ३४ /- दर देण्यास नकार दिला. अशा पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहाबाहेर शासन आदेशाची होळी करून संघर्ष समिती, किसान सभा व रयत क्रांती संघटनेने आंदोलनाची घोषणा केली होती. राज्यातील सर्व दुध संकलन केंद्रांवर रद्दी ठरलेल्या शासन आदेशाची २४ नोव्हेंबर रोजी  होळी करून सरकारचा निषेध करण्याची घोषणा यानुसार करण्यात आली होती. यानुसार आज राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये शेकडो संकलन केंद्रांवर रद्दी ठरलेल्या शासन आदेशाची होळी करून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. दुध कंपन्या व दुध संघांनी सरकारच्या परिपत्रकाचे पालन करावे व दुधाला किमान ३४ रुपये भाव द्यावा शिवाय भेसळ रोखण्यासाठी  दुध भेसळ, वजनकाटे आणि  मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी संबंधित विभागांकडून काढून घेऊन दुग्धविकास विभागाकडे द्यावी, दुधदर निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीस कायदेशीर वैधता द्यावी, या समितीची  दर शिफारस दुधसंघ व दुध कंपन्यांवर बंधनकारक करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सातारा जिल्ह्यातील  रेठरे  गावी, तर डॉ. अजित नवले यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अंबड येथे आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी  डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख,सुहास पाटील,  सतीश देशमुख, सुदेश इंगळे, जोतीराम जाधव, दादा गाढवे, दीपक वाळे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे,  डॉ. अशोक ढगे, नंदू रोकडे, सदाशिव साबळे, डॉ. संदीप कडलग, सुरेश भोर  आदींनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..